जळगाव : जळगाव तालुक्यातील विटनेर गावातील एका धार्मिक स्थळावर पाकिस्तानचा झेंडा लावल्याची चर्चा गावात पसरली. या घटनेनंतर ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले. या प्रकारानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी त्या धार्मिक स्थळाकडे धाव घेत घडलेला प्रकार जाणून घेतला. याबाबत पोलिसांनाही माहिती दिल्याने पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व सहकार्यांनी धाव घेत धार्मिक स्थळावर लावलेला झेंडा ताब्यात घेतला.
झेंड्यावरील वादावरून संबंधितावर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. गोपाळ सुपडू कहार (नेरी, ता.जामनेर) यांनी हा झेंडा लावल्याचे समजताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यांनी आपल्याला स्वप्न पडल्याचे सांगून प्रार्थनास्थळावर ध्वज नसल्याने तो लावण्याची मला आज्ञा झाली. त्यामुळे आपण हा ध्वज लावल्याचे त्यांनी कबुल केले. शिवाय असा ध्वज हा पाकिस्तानचा असतो, अशी आपल्याला कल्पनाही नसल्याचे त्यांनी प्रांजळपणे कबूलही केल्याने पोलिसांनी त्यांना चौकशी करून सोडून दिले. मात्र, हा पाकिस्तानचा झेंडा नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी ग्रामस्थांची समजूत घातली. तसेच या झेंड्यामुळे पुन्हा अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून हा झेंडा जप्त करण्यात आला आहे.
अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार
विटनेर गावाजवळ एक दर्गा आहे. याठिकाणी पाकिस्तानी झेंड्याप्रमाणे दिसणारा झेंडा फडकत असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी तपास करण्यात आला. गोपाळ सुपडू कहार याने तो झेंडा लावल्याचे समजलं. त्यानंतर गोपाळ कहार याला आणून त्याची चौकशी करण्यात आली. बाबा स्वप्नात आले आणि म्हणून मी तो झेंडा लावला. पण तो पाकिस्तानचा झेंडा आहे किंवा तसा दिसणारा झेंडा आहे याची आपल्याला माहिती नाही, असं गोपाळ कहार यानं सांगितले. जप्त केलेल्या झेंड्याला सफेद किनार आहे. पाकिस्तानच्या झेंड्याला अशी सफेद किनार नाही. त्यामुळे तो पाकिस्तानचा झेंडा नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिली. त्यामुळे कुणीही अफवा पसरवू नये. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक हिरे यांनी दिला आहे.