मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन केलं. या दौऱ्यातून पंतप्रधानांनी महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. मुंबईत विकास कामं जलद गतीने करण्यासाठी भाजप आणि एनडीएच्या सरकारला पाठिंबा द्या. मुंबई महापालिकेवर भाजपला सत्ता द्या, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
यावेळी पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेला संबोधित करताना शिंदे-फडणवीस सरकारचा डबल इंजिन सरकार असा उल्लेख करत सरकारचे कौतुक केले. तसेच राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर विकास कामांना गती मिळाल्याचेही मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला. “महाराष्ट्रात काही काळासाठी विकास कामं धीम्या गतीनं सुरू होती. पण शिंदे-फडणवीस हे डबल इंजिन सरकार येताच विकास कामांना गती मिळाली”, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
मुंबईचा कायापालट होणार
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, आगामी काळात मुंबईच्या विकासासाठी पैशाची अजिबात कमतरता पडू देणार नाही. मुंबईतील लोकांची प्रत्येक अडचण आणि समस्या समजून घेऊन एक गोष्ट मी जबाबदारीनं सांगतो की भाजप आणि एनडीए सरकार विकास कामांच्या आड कधीच येत नाही. विकास कामांमध्ये कधीच भाजपा सरकार राजकारण आणत नाही. येणाऱ्या काही वर्षात मुंबईचा कायापालट होणार आहे. पण यासाठी राज्य आणि स्थानिक पालिकेतील सरकारनं हातात हात घेऊन काम करणं गरजेचं आहे, असेही मोदी म्हणाले.
रेल्वे कनेक्टिव्हीटीला गती
छोट्या व्यापारांसाठी आम्ही कर्ज उपलब्ध करून दिले. आजही 1 लाखाहून अधिक फेरिवाल्यांच्या खात्यात पैसै जमा झाले. मुंबई लोकल आणि महाराष्ट्रातील रेल्वे कनेक्टिव्हीटीला गती मिळत आहे. रेल्वे स्टेशनला एअरपोर्टप्रमाणे विकसित करण्यात येत आहे. देशात सर्वात जुन्या रेल्वे स्टेशनपैकी एक छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन विकसित होणार आहे. लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा बनतील. तसेच वाहतुकीच्या सर्व सुविधा एकाच छताखाली मिळतील. मल्टिमॉडेल कनेक्टिव्हीटी विकसित केले जात असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.