नवी दिल्ली : आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात आज शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाला द्यायचं यावर सुनावणी सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोघांकडूनही पक्षाचं नाव शिवसेना आणि चिन्ह धनुष्यबाण यावर दावा सांगण्यात आला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून पक्षाचं चिन्ह आणि नाव गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज चिन्ह आणि नावाबाबत महत्त्वाची सुनावणी सुरु असून, दोन्ही गटाकडून युक्तीवाद केला जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेच्या वतीने देवदत्त कामत यांचा युक्तीवाद सुरु आहे. राजकीय पक्ष म्हणून आमचं संख्याबळ विचारात घ्यावं, प्रतिनिधींचा विचार करता आमच्याकडे संख्याबळ जास्त असल्याचा देवदत्त कामत यांचा युक्तिवाद आहे. पक्ष संघटनात्मक संख्याबळ आणि लोकप्रतिनिधींची संख्याबळ यात फरक आहे. त्यामुळे सादिक अली केस या प्रकरणात लागू होत नसल्याचे कामत यांनी मांडले आहे. तर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद सुरु करताच केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना थांबवलं. आधी ठाकरे गटाचा युक्तिवाद होऊ द्या, असं आयोगाने म्हटलं आहे.
ठाकरे गटच खरी शिवसेना- कपिल सिब्बल
शिंदे गटाच्या याचिकेत खोटी विधाने, हा वाद म्हणजे संसदीय कार्यपद्धतीची थट्टा, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आहे. प्रतिनिधी सभा आमच्या बाजूने, प्रतिनिधी सभाच पक्ष चालवते, पक्ष सोडून गेलेले सदस्य सभेचा भाग होऊ शकत नाही असे सिब्बल यांनी दावा केला. आम्ही सर्व कारभार प्रतिनिधी सभाच्या माध्यमातून करतो, त्यामुळे सभा आमच्या बाजूने, प्रतिनिधी सभाच्या कार्यकारिणीसाठी मुदतवाढ द्या अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली. प्रतिनिधी सभेला जितके अधिकार आहेत तितके अधिकार कुणालाच नाही. शिंदे गट प्रतिनिधी सभा होऊ शकत नाही. आमचे कागदपत्रे योग्य आहेत, शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये चुका असल्याचा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला.