बीड : बीड जिल्ह्यातील केजमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिला नायब तहसीलदाराला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेने संपूर्ण मराठवाडा हादरुन गेला आहे. केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यासोबत हा प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार ही घटना कौटुंबिक वादातून झाल्याचं सांगण्यात येत आहे.
केज तहसील कार्यालयातील, संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला झाल्याची थरारक घटना घडली आहे. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आशा वाघ यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या असून सध्या त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चार जणांनी रस्त्यात अडवून केला हल्ला
नायब तहसीलदार आशा वाघ आज दुपारी जेवण करून तहसील कार्यालयाकडे मोपेडवरून येत होत्या. त्याचवेळी एका चारचाकी वाहनाने त्यांचा रस्ता अडवला. त्यातून उतरलेल्या एका महिलेसह इतर 4 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी बॉटलमधील पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या आहेत. केज येथील सरकारी रुग्णालयात आशा वाघ यांच्यावर उपचार सुरु आहेत. या हल्ल्याचा पोलीस कसून तपास करत आहेत. आरोपी हल्ल्यानंतर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.