मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात मोठा कट उधळला गेला आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यात सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याची बाब उघडकीस आली आहे. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या ठिकाणाहून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एकाकडे घातक शस्त्रे सापडली आहेत. दोन दिवसांपूर्वी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील एमएमआरडीए मैदानावर पंतप्रधान मोदींची सभा झाली होती. मुंबई पोलिसांनी दोन्ही आरोपींना येथून अटक केली आहे. कात्रम चंद्रगाई कावड आणि रामेश्वर मिश्रा अशी या आरोपींची नावे आहेत.
कात्रमचे वय 39 असून तो मुंबईला लागून असलेल्या भिवंडी भागातील रहिवासी आहेत. तो हॉटेल आणि वाहतूक व्यवसायाशी संबंधित आहे. पीएम मोदींच्या सभेच्या ठिकाणी गस्त घालत असताना पोलिसांना त्यांच्यावर संशय आला आणि त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्याकडून स्मिथ अँड वॅगन स्प्रिंगफील्ड रिव्हॉल्व्हरसह चार गोळ्या जप्त करण्यात आल्या. त्याच्याकडे रिव्हॉल्व्हरचा परवाना असल्याचीही माहिती मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात कलम 37 (1), 135 मापोका 1951 अन्वये कात्रम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चौकशी सुरू आहे.
एनएसजी जवान असल्याचे सांगून कार्यक्रमात घुसला
एनएसजी जवान असल्याचे भासवून आत आलेल्या आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. रामेश्वर मिश्रा नावाचा हा व्यक्ती पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमस्थळी पोहोचण्याच्या सुमारे 90 मिनिटे आधी नवी मुंबईहून येथे पोहोचला. एनएसजीमध्ये नायक पदावर काम करत असल्याचे भासवून तो सभेच्या ठिकाणी दाखल झाला होता. अशाप्रकारे तो व्हीव्हीआयपी परिसरात जाण्याचा प्रयत्न करत होता, जिथे कडक सुरक्षा आहे. मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना याचा संशय आल्याने त्यांनी त्याला थांबवून चौकशी सुरू केली.
आरोपींकडे सापडले बनावट आयडी
एंट्री घेण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी तो इकडे तिकडे फिरत होता. त्यामुळे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्यावर लक्ष ठेवले. अर्धा तास त्याच्यावर नजर ठेवल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडून चौकशी सुरू केली. 13 जानेवारी रोजी जारी करण्यात आलेल्या एलिट नॅशनल सिक्युरिटी गार्डचे (एनएसजी) बनावट आयडी आरोपींकडे सापडले. त्यात रेंजर म्हणून त्याच्या पोस्टिंगचा उल्लेख आहे. पण आयडीच्या रिबनवर दिल्ली पोलीस सुरक्षा (पीएम) लिहिलेले आहे.
आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी
पोलीस चौकशीदरम्यान, आरोपी दावा करत होता की तो एनएसजीच्या पठाणकोट हबमध्ये पोस्टिंगवर आहे. मात्र मुंबई पोलिसांनी तपास केला असता त्याचा आयडी बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी मिश्राविरुद्ध भादंवि कलम 171, 465, 468 आणि 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 24 तासांची पोलीस कोठडी सुनावली.