जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघात आता सत्तांतर झाल्यानंतर नव्या संचालक मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. दूध संघातील वादग्रस्त 132 नोकरांची भरती रद्द करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे. दूध संघातील नोकर भरती रद्द केल्याची घोषणा भाजपचे आमदार आणि दूध संघाचे अध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी केली आहे. यावरुन आता राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी आमदार चव्हाण यांच्यावर निशाना साधला आहे.
जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघात माजी अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांच्या कार्यकाळात 32 अधिकारी व 132 कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी लेखी परीक्षा देखील दिली होती. मात्र या भरतीवर दूध संघाच्या माजी कर्मचाऱ्यांनीच हरकत घेतली होती. दूध संघाच्या संचालकांची मुदत संपली असतांना ते भरती करू शकत नाही, तसेच आरक्षण लागू असतांना विना आरक्षण भरती पक्रिया राबवली जात असल्याचा आराप केला गेला. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती. मंदाकिनी खडसे यांच्या काळात संघाला 9 कोटी 60 लाख रूपये तोटा झाल्याचा दावा करत आ. मंगेश चव्हाण यांनी दूध संघाची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे कारण देत ही भरती प्रक्रिया संचालक मंडळाने रद्द केल्याचे सांगितले.
त्या लोकांना कायम करण्याचा प्रयत्न- खडसे
यावर राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाख खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय हेतूने ही कारवाई केली असल्याचे खडसेंनी म्हटले आहे. एकीकडे बेरोजगारी, बेकारी वाढत आहे. जे लोक आज नोकरीवर आहेत, त्यांनाच कमी करण्याचा हा प्रयत्न म्हणजे राजकीय हेतूपोटी असल्याचे खडसे म्हणाले. या निर्णयामुळं 100 ते सव्वाशे कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. 90 टक्के लोक पाच ते सहा वर्षांपासून दूध संघ नोकरी करत आहेत. त्या लोकांना कायम करण्याचा आमचा प्रयत्न होता. दूध संघावर पाच महिन्यापासून फक्त आरडा ओरड सुरु आहे. तुम्ही काही ठोस निर्णय घेऊन जनतेपुढे मांडून दाखवा असे एकनाथ खडसे म्हणाले.