पुणे : पुण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील राहत्या घरासमोर हा प्रकार घडला. कुख्यात गुंडानी कुटुंबीयांसमोरच गोळीबार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे. मात्र, मनसे जिल्हाध्यक्षावरच गोळीबार झाल्याने शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर थिगळे हे त्यांच्या घरी सात रकस्थळ इथे घराजवळ उभे असताना अज्ञात व्यक्ती तिथे आला. त्याने थिगळे यांना धमकी देत पैशाची मागणी केली. “मी खेडचा भाई आहे. एकाला घालवलाय, तुलाही माज आलाय संपवतोच तुला”, असं म्हणत पिस्तुल रोखून समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. त्यानंतर या गुंडांनी गोळीबार केला. गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी करणाऱ्या आरोपीवर याआधीही खुनाचा गुन्हा दाखल असून तो सध्या जामीनावर बाहेर आहे.
मोठा अनर्थ टळला
या गुंडाने समीर यांच्या दिशेनं गोळी चालवण्याचा प्रयत्न केला, मात्र पिस्तुलातून गोळी सुटलीच नाही. यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र त्यानंतर दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांनी हवेत फायरींग केली. त्यानंतर गोळीबार करत आरोपी घटना स्थळावरून फरार झाले आहेत. कुटुंबियांसमोर ही घटना घडल्याने घरात भीतीचं वातावरण आहे. याप्रकरणी राजगुरुनगर पोलिसांत मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.