जळगाव: जळगाव शहर विधानसभेत भाजपची सत्ता असून, सध्या राजूमामा भोळे विद्यमान आमदार आहेत. असे असले तरी भाजपमधील गटबाजी काही लपून राहिलेली नाही. विधानसभेसाठी अनेक इच्छुकांच्या आकांक्षेला धुमारे फुटू लागले आहे. जळगाव महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली असून, शहरात भावी आमदार म्हणून त्यांचे बॅनर झळकल्याने भाजपातील गटबाजी समोर आली आहे.
माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात शुभेच्छा फलक लागले आहेत. यावर त्यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपात आमदारकीसाठी आणखी एक उमेदवाराच्या नावात भर पडल्याची चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणुकीला अजून कालावधी असला तरी इच्छुकांकडून आतापासूनच तयारी सुरु केली आहे. भाजपात राजूमामा भोळे विद्यामान आमदार आहेत. त्यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना पराभूत करुन विजय मिळवला आहे. मात्र, आता त्यांना पक्षातूनच विरोध होत असल्याचे चित्र आहे.
जळगावच्या राजकारणात सोनवणे कुटुंबियांचे वर्चस्व
जळगाव शहरातील सोनवणे कुटुंबीय आणि राजकारण हे जणू समीकरणच बनले आहे. गेल्या ५९ वर्षांपासून या कुटुंबातील सर्वच प्रमुख सदस्य राजकारणात आहेत. सरपंचपदापासून विधानसभेपर्यंतच्या निवडणुका कुटुंबातील सदस्यांनी लढविल्या असून त्यात यश मिळविले आहे. सोनवणे कुटुंबाचे महापालिकेत वर्चस्व असून, माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठोपाठ डॉ.अश्विन सोनवणे हे नगरसेवक म्हणून निवडून आले. यानंतर त्यांना भापजने उपमहापौर पद दिले होते. आता विधानसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
भाजपात वाढली स्पर्धा
भाजपात आमदारकीसाठी आतापासूनच स्पर्धा सुरु झाली आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षाच्या नेत्यांना इच्छुकांना सांभाळण्याचे आव्हान असणार आहे. विधानसभा निवडणुकीला अजून वेळ असला तरी, इच्छुकांकडून आतापासूनच फिल्डींग लावली जात आहे. त्यामुळे येणारा काळच ठरवेल पक्षश्रेष्ठी कुणाला संधी देतात.