मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे निमित्त साधत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची आज घोषणा करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. सध्या राजकारणात काही वाईट परंपरा, चाली सुरू आहेत. त्यावर आघात करण्यासाठी ठाकरे-आंबेडकराची पुढची पिढी वारसदार एकत्र येऊन देश प्रथम या उद्दिष्टावर काम करणार आहोत असं सांगत उद्धव ठाकरे यांनी वंचित आघाडीसोबतची युतीची घोषणा केली.
या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, जनतेला भ्रमात ठेऊन हुकुमशाहीकडे वाटचाल केली जात आहे. नको त्या वादात अडकवून आपले इच्छित साधायचं. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, घटनेचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी शिवसेना-वंचित बहुजन आघाडी एकत्र येत आहे. तळागाळातील जनतेपर्यंत जे काही सुरू आहे ते पोहचवण्याची गरज आहे. निवडणुका आल्यावर गरिबांचा उदोउदो करायचा. निकालानंतर गरीब रस्त्यावर आणि यांची उड्डाणे सुरू होतात त्यासाठी आम्ही एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवारांसोबत जुने भांडण- प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडी-शिवसेना यापुढे एकत्रित निवडणूक लढवतील. मोदींनी भाजपामधील नेतृत्वही संपवले आहे. सत्तेचा अमरपट्टा कुणी घेऊन आले नाही. नरेंद्र मोदी यांचाही अंत होणार. संकटात राजकीय नेतृत्व उभं राहते असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. जिथे जिथे प्रादेशिक पक्ष स्वत:चं नेतृत्व उभे करत असेल तिथे आम्ही मदत करू. राजकारण हे मुद्देसूद, नितीमत्तेवर करू. शरद पवारांसोबत जुने भांडण, शेतातलं भांडण नाही. नेतृत्वाचं भांडण आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा आम्ही बाळगतो असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.