जळगाव : शहरातील दाणा बाजारात सुकामेवा विक्रीचे दुकान असलेल्या व्यापाऱ्याला लुटल्याची घटना सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ घडली. ईश्वर मेघाणी (रा.सिंधी कॉलनी) असे व्यापाऱ्याचे नाव असून बॅगमध्ये आठ लाख रूपये, लॅपटॉप आणि मोबाईल होता.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील सिंधी कॉलनी येथील व्यापारी ईश्वर मेघाणी यांचे दाणा बाजारात सुकामेवा विक्रीचे दुकान आहे. सोमवारी जिरे विक्रीतून त्यांना आठ लाख रुपये मिळाले होते. बँकेत भरणा करण्यासाठी त्यांनी रक्कम बॅगेत ठेवले मात्र बँकेत भरणा न करता आल्यामुळे रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास ते पैशांची बॅग घेवून दुचाकीने घराकडे निघाले होते. दररोज त्यांच्यासोबत मुलगा असतो मात्र सोमवारी रात्री ते एकटेच होते.
बॅग हिसकावून चोरटे पसार
पांडे चौकाजवळील राधाकृष्ण मंगल कार्यालय वळण रस्त्यावर ते आले असता, अचानक रस्त्यालगत दबा धरून बसलेल्या एकाने त्यांना अडविले. मेघाणी यांना काही कळायच्या आतच चोरट्याने पैशांची बॅग हिसकावून दुचाकीवर असलेल्या दुस-या चोरटयासोबत पळ काढला. नेमके तेव्हा आणखी एक चोरटा दुसऱ्या दुचाकीवर त्यांच्यासोबत सुसाट निघाला. मेघाणी यांनी आरडा ओरड करताच एका तरुणाने त्यांचा पाठलाग केला. पण चोरटे स्मशानभूमीकडून पसार झाले.
पोलिसांची घटनास्थळी धाव
रात्री १० वाजता अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्यासह एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, जिल्हापेठ, एमआयडीसी आणि एलसीबीच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. पोलिसांनी विविध पथके तपासकामी रवाना केले असून परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहे.