मुंबई : भाजपने सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करण्यासाठी चर्चा केली होती. मात्र, सुरेश जैन मराठी भाषिक नाहीत म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९९ साली जैन यांना मुख्यमंत्री करायला नकार दिला होता. याबाबदचा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. यावेळी बाळासाहेबांची मराठी भाषिकांविषयीची भूमिका सांगताना जळगावचे माजी आमदार सुरेश जैन यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतचा उल्लेख केला.
काय म्हणाले राज ठाकरे?
बाळासाहेब ठाकरे कडवट मराठी होते. १९९९ सालची गोष्ट आहे. काही कारणास्तवर शिवसेना-भाजप युती मुख्यमंत्रीपदावर अडत होती.१५-२० दिवस राजकारण सुरु होतं. आमदारांचं इकडे-तिकडे जाणं सुरु होतं. एके दिवशी दुपारच्या वेळेला ‘मातोश्री’वर दोन गाड्या आल्या. त्यातून जावडेकर आणि आणखी भाजपचे दोन-चार जण आले. बाळासाहेबांना भेटायचय म्हणाले. आज आपलं सरकार बसेन, त्यामुळे बाळासाहेबांची भेट महत्त्वाची आहे म्हणाले. परंतु बाळासाहेब झोपले होते.
बाळासाहेबांनी दिला नकार
राज ठाकरे म्हणाले निरोप देतो पण भेट शक्य नाही. राज ठाकरेंनी त्यांना उठवून निरोप दिला की, भाजपचे नेते आले आहेत, त्यांनी सांगितले की संध्याकाळपर्यंत सरकार बसेल. सुरेश जैन मुख्यमंत्री असतील ते आमदारांची जुळवाजुळव करतील. त्यावर बाळासाहेब म्हणाले, त्यांना जावून सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच असेल दुसरा असणार नाही. असं म्हणून ते पुन्हा झोपी गेले. मराठी बाण्यासाठी या माणसाने माझ्यासमोर सत्तेवर लाथ मारल्याची आठवण राज ठाकरेंनी सांगितली.