धरणगाव : तालुक्यातील गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायत ग्रामसेवकाला अडीच हजाराची लाच घेतांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. अनिल नारायण गायकवाड (वय-५०) असे ताब्यात घेतलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.
तक्रारदार हे गारखेडा येथील रहीवासी असून त्यांनी गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायती मधील ग्रामसेवक अनिल गायकवाड यांच्याकडे ग्रामपंचायती मध्ये सन २०१५ ते २०२० या कालावधी दरम्यान ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध योजनांच्या कामाचे झालेले लेखापरीक्षण बाबतची माहिती ही माहितीच्या अधिकाराचा अर्ज करून मागितलेली होती. सदरची माहिती ही वेळेत न मिळाल्याने तक्रारदार यांना सदर माहिती देण्याच्या मोबदल्यात ग्रामसेवक गायकवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष प्रथम ३ हजार रुपये व तडजोडीअंती अडीच हजार रुपये लाचेची मागणी केली.
गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु
सदर लाच मागणी केलेली रक्कम धरणगाव अमळनेर रोडवरील सिंधु ढाबा येथे पंचासमक्ष स्वत: स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ग्रामसेवक गायकवाड यांच्यावर धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरक्षिक संजोग बच्छाव, पोलीस निरिक्षक एन. एन. जाधव, बाळू मराठे, ईश्वर धनगर, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, सुनील पाटील, रविंद्र घुगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल शैला धनगर, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, सुनील वानखेडे, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर, अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.