नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीमध्ये भीक मागणे तेथील कायद्यानुसार गुन्हा मानले जाते. पण भीक मागण्याचे एक प्रकरण समोर आले आहे, ज्याने अबुधाबी पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. पोलिसांनी एका महिला भिकाऱ्यावर कारवाई केली असून, तिच्याकडून एक आलिशान कार आणि बरीच रोकड जप्त करण्यात आली आहे. ही महिला दररोज शहरातील मशिदींसमोर भीक मागायची आणि आपल्या आलिशान कारमधून घरी जात असे. भीक मागणाऱ्या महिलेवर एका व्यक्तीला संशय आल्याने त्याने पोलिसांना माहिती दिली.
खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, अबू धाबीच्या रहिवाशांना संशय आला की ही महिला परिसरातील मशिदींमध्ये भीक मागत आहे. यानंतर त्या व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिच्यावर लक्ष ठेवले, त्यानंतर पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली.
महागडी आलिशान कार जप्त
ही महिला दिवसभर शहरातील विविध मशिदींमध्ये भीक मागायची. भीक मागून ती लांबपर्यंत चालत जायची. पोलिसांनी तिचा पाठलाग केला तेव्हा कळले की तिच्याकडे महागडी आलिशान कार आहे जी ती चालवते आणि भीक मागून घरी जाते. पोलिसांनी तिला पकडले असता, तिच्याजवळ बरीच रोकड सापडली, ती जप्त करण्यात आली. पोलिसांनी महिलेवर कडक कारवाई केली आहे.
पोलिसांकडून 159 भिकाऱ्यांना अटक
अबू धाबी पोलिसांनी गेल्या वर्षी 6 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान 159 भिकाऱ्यांना अटक केल्याचे सांगितले. पोलीस अधिकारी म्हणतात की भीक मागणे हा सामाजिक शाप आहे जो कोणत्याही समाजाची सभ्य प्रतिमा डागाळतो. पोलिसांनी सांगितले की, ‘भीक मागणे हे समाजात असंस्कृत कृत्य आहे आणि UAE मध्ये हा गुन्हा आहे. अनेक जण भिकारी असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करतात. UAE मध्ये भीक मागणाऱ्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे. भीक मागितल्यास, एखाद्या व्यक्तीला तीन महिने तुरुंगवास आणि पाच हजार दिरहम (सुमारे एक लाख 11 हजार रुपये) किंवा दोनपैकी एक दंड होऊ शकतो. जर एखादी व्यक्ती संघटित पद्धतीने आपली टोळी चालवून भीक मागते, तर त्याला सहा महिने तुरुंगवास आणि एक लाख दिरहम (सुमारे 22 लाख 17 हजार रुपये) दंडाची शिक्षा आहे.