मुक्ताईनगर राजमुद्रा वृत्तसेवा | तालुक्यातील बोहर्डी येथे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात मुक्ताईनगरच्या गंभीर जखमी झालेल्या तरुणाला जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी रुग्णालयात नेण्यासाठी तातडीने मदत केली असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या अपघातात जखमी असलेल्या रुग्णाला वेळीच उपचार मिळू शकले.
प्राप्त माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्र ६ वर तरसोद ते मुक्ताईनगर दरम्यान चौपदरीकरण झाले असून नवीन रस्त्यावरून वाहनधारक भरधाव वेगाने वाहने चालवत असलल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दररोज छोटे मोठे अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे. दिनांक २३ जून रोजी मुक्ताईनगर येथील त्रिशूल (विकी) मराठे हा युवक भुसावळ वरून मुक्ताईनगर येथे दुचाकीवर येत असतांना बोहर्डी फाटा येथील उड्डाणपुलाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्या मुळे गंभीर जखमी अवस्थेत पडून होता. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर या या मार्गाने जात असतांना त्यांना या अपघाताचे वृत्त समजले त्यांनी लगेच मुक्ताईनगर येथील रुग्णवाहिका बोलावली व विकी मराठे यांना पुढील उपचारासाठी भुसावळ येथे रुग्णालयात रवाना केले. रोहिणी खडसे यांनी दाखवलेल्या सतर्कते बद्दल नागरिकांनी कौतुक केले आहे. यावेळी, प.स. चे माजी सभापती राजेंद्र माळी, शिवराज पाटील आणि बोहर्डी ग्रामस्थांनी मदत केली.