नांदेड : नांदेडमध्ये ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या आपल्याच मुलीची वडील आणि भावाने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शुभांगी जोगदंड (वय 23) असं मृत मुलीचं नाव आहे. प्रेम संबंधाच्या विरोधातून कुटुंबीयांनीच तिचा खून करून, प्रेत जाळल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय शुभांगी ही बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्षांत शिकत होती आणि तिचे गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, कुटुंबीयांना त्यांचं नात मान्य नव्हतं. यानंतर घरच्यांनी तिचं दुसरीकडे लग्न जुळवलं, पण तिनं हे लग्न मोडलं. यामुळे आपली गावात आणि समाजात बदनामी झाली, या रागातून मुलीचे वडील जनार्दन जोगदंड, भाऊ केशव जोगदंड, मामा गिरधारी जोगदंड, कृष्णा आणि गोविंद या दोन चुलत भावांनी मुलीची हत्या केली.
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
शुभांगीची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिला शेतात नेऊन जाळलं आणि तिची राख ओढ्यात फेकून दिली. तीन-चार दिवसांपासून गावातील मुलगी अचानक गायब झाल्यामुळे गावातील लोकांना संशय आला. यानंतर काही नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि हा धक्कादायक ऑनर किलिंगचा प्रकार उघड झाला. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे.