मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या काही प्रमुख मागण्यांसाठी 2021 मध्ये दीर्घकाळ संप केला होता. याकाळात कर्मचाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले होते, त्यामुळे 124 कर्मचाऱ्यांनी त्यांचे जीवन संपवले होते. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटूंब उघड्यावर पडले होते. आता या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
एसटी संपकाळातील कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. संप काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना आता नोकरी मिळणार आहे. राज्यातील परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे. परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील 124 मृत एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना नोकरी मिळणार आहे.
124 कर्मचाऱ्यांचा मृत्यू
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. जवळपास तीन महिने हा संप चालला होता. यादरम्यान, कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं होतं. संप काळात 124 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांचा संपकाळात मृत्यू झाला, आता त्यांच्या जागी वारसांना नोकरी देण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्याच कर्मचाऱ्यांच्या जागेवरती नोकरी मिळणार आहे. विशेष म्हणजे या वारसांना सेवासलगतेचाही लाभ मिळणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ
मार्च 2022 मध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर येण्यास सुरुवात केली. संपकाळात पगाराविना आर्थिक संकटापुढे टिकाव न धरू शकलेल्या 124 अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले होते. या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. जवळपास चार महिने एसटी सेवा ठप्प होती. तरीही एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याची मागणी मान्य झाली नव्हती. परंतु, सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांची वाढ केली होती.