मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | कापूस पणन महासंघाचे संचालक तथा जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसेनजीत पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. स्वगृही परतलेल्या प्रसेनजीत पाटील यांच्या येण्याने बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजून एक जागा भक्कम झाल्याचा विश्वास प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रसेनजीत पाटील यांच्यामागे सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे. तसेच आपल्या भागातील धरणाचे काम अधिक जलद गतीने करून आपला पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा आमचा प्रयत्न असून २०२४च्या निवडणुकीआधी हे काम पूर्ण करण्याचा विश्वास ना. जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.
प्रसेनजीत पाटील यांच्या प्रवेशाने विदर्भात पक्षाला अधिक बळकटी मिळणार असून प्रतिकूल परिस्थिती बदलते, आपण जिद्द सोडायची नसते, आगामी सर्व निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच झेंडा फडकला पाहीजे अशा जोमाने सर्वांनी कामाला सुरुवात करा, असे आवाहन ना. अजितदादा पवार यांनी यावेळी उपस्थितांना केले.
तसेच यावेळी प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान परिषद सदस्य आमदार अरूण लाड यांच्या पुढाकाराने भाजपचे सांगली जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले यांनीही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे, वरिष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी आ. उदयसिंग पाडवी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.