जळगाव : बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरणी तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला असून, एसआयटीचे पथक गेल्या दोन दिवसांपासून चाळीसगाव येथे ठाण मांडून आहेत. या पथकाकडून गुन्ह्यातील संबंधित व्यक्तींचे जबजबाब दोन नोंदविले जात आहेत.
मुख्य संशयित सुनील झंवर यांना जामीन मिळवून देण्यासाठी तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण, अॉडिटर शेखर सोनाळकर यांच्यासह चाळीसगावचा वाइन शॉप चालक उदय नानाभाऊ पवार या तिघांनी सुनील झंवर यांचा मुलगा सूरज याच्याकडून १ कोटी २२ लाख रुपये खंडणी घेतल्याच्या गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकाकडून केला जातो आहे.
पुरावे, सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जमा केले
यात तीन दिवसांपासून फिर्यादी सूरज झंवर, सुनील झंवर, तेजस मोरे व आयुष मणियार यांचे जबाब सुरू होते. शनिवारी पोलिसांनी सर्वांचे जबाब पूर्ण केले. तसेच फिर्यादी सूरज झंवर यांना खंडणी मागितल्याच्या अॉडिओ पुरावे, सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जमा केले.
सोमवारी आणखी जबाब घेणार
हे सर्व पुरावे सूरज झंवर यांनी तयार करून फॉरेन्सिक डिपार्टमेंट यांच्याकडून प्रमाणित केले होते. तरी देखील तपासाचा भाग म्हणून हे पुरावे पुन्हा एकदा तपासून प्रमाणित केले जाणार आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयात तयार करण्यात आलेल्या कक्षात जबाब घेतले जात आहेत. सोमवारी आणखी काही जणांचे जबाब हाेतील.