नांदेड : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी नांदेडमध्ये जाहिर सभा घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री घेतली आहे. केसीआर यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या पक्षाचे नाव बदलून ‘भारत राष्ट्र समिती’ केले आहे. या नामकरणाच्या दिवशी त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेशाची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांची पहिलीच सभा महाराष्ट्रात झाली आहे. यावेळी सभेची सुरुवात महाराष्ट्राचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा…या गाण्याने झाली.
नांदेड येथील सभेत केसीआर यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यावर जोर दिला. ते म्हणाले, गेल्या 75 वर्षात कोणत्याच सरकारने शेतकऱ्यांच्या हिताची कामे केली नाहीत. अनेकजण आमदार-खासदार झाले, पण शेतकऱ्यांसाठी पुढे आले नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांनाच राजकारणात यावे लागेल. शेतकऱ्यांनो उठा आणि तुम्हीच आमदार-खासदार व्हा. जोपर्यंत शेतकऱ्यांचे सरकार येणार नाही, तोपर्यंत तुमचे म्हणने कुणीच ऐकणार नाही. अब कि बार किसान सरकार…अशी घोषणा केसीआर यांनी केली.
‘जोक इन इंडिया’ झाला
स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने 54 वर्षे, तर भाजपने 16 वर्षे सत्ता भोगली. देशातील बजबजपुरीला काँग्रेस – भाजप जबाबदार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मेक इन इंडिया’ बनवणार होते पण ‘जोक इन इंडिया’ झाला. कुठे गेला ‘मेक इन इंडिया’ देशातील प्रत्येक शहरात चायना बाजार भरला. दीपावलीचे दिवे, गणेशमूर्ती, राष्ट्रीय ध्वज, फटाके, होळीचे रंगही चीनमधून येतात अशी टीका तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली.