तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.8 इतकी होती. आग्नेय तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपामुळे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. दोन्ही देशांमध्ये भूकंपामुळे आतापर्यंत 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. तुर्की आणि सीरिया या दोन्ही देशांमध्ये अनेक ठिकाणी इमारती कोसळल्या. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कस्तानमधील गॅझियानटेप येथे होता. हे सीरिया सीमेपासून 90 किमी अंतरावर आहे. अशा स्थितीत सीरियातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्केही जाणवले. सीमेच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात विध्वंस झाल्याचे सांगण्यात येत आहे.
झोपेतच लोकांना मृत्यूनं गाठले
स्थानिक वेळेनुसार तुर्कीमध्ये पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी भूकंप झाला. त्याची खोली जमिनीच्या आत 17.9 किलोमीटर होती. भूकंपाचा केंद्रबिंदू गझियानटेपजवळ होता. भूकंपाच्या जोरदार धक्क्याने अनेक इमारती कोसळल्या. एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, आतापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. तुर्कीच्या उस्मानियामध्ये 34 इमारती उद्ध्वस्त झाल्या. तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रजब तय्यब एर्दुगन यांनी ट्विट करून भूकंपग्रस्त भागात बचावकार्य सुरू असल्याचे सांगितले. भूकंपाच्या वेळी किमान 6 आफ्टरशॉक बसले होते. एर्दुगन यांनी लोकांना नुकसान झालेल्या इमारतींमध्ये प्रवेश न करण्याचे आवाहन केले.
सीरियाच्या लेबनॉनमध्येही भूकंपाचे धक्के
सीरियातील लेबनॉनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. सीरियातील अलेप्पो आणि हमा शहरातून नुकसान झाल्याचे वृत्त आहे. सिव्हिल डिफेन्सच्या म्हणण्यानुसार, सीरियामध्ये तुर्कीच्या सीमेला लागून असलेल्या भागात अनेक इमारती कोसळल्या. यात 42 लोकांचा मृत्यू झाला आहे. दमास्कसमध्येही भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक रस्त्यावर उतरले. लेबनॉनमध्ये सुमारे 40 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. तुर्कस्तानच्या भौगोलिक स्थितीमुळे येथे अनेकदा भूकंप होतात. 1999 च्या भूकंपात 18000 लोकांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबर 2011 मध्ये झालेल्या भूकंपात 600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.