नाशिक : शिवसंवाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर आले आहेत. असे असताना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठे भगदाड पडले आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक जेष्ठ शिवसैनिक, माजी नगरसेवक, पदाधिकारी असा पन्नासहून अधिक जणांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.
शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये तिसऱ्यांना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरास्ते यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. नाशिक ग्रामीणमधील पन्नासहून अधिक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. यात जेष्ठ शिवसैनिक शिवाजी पालकर, राजेंद्र घुले, गणेश शेलार, रामभाऊ तांबे, प्रशांत जाधव, मंगेश दिघे, मयुर जोशी, निलेश शेवाळे आदींसह इतर महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्का
लवकरच राज्यातील प्रमुख महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामध्ये नाशिक महापालिकेचा देखील समावेश आहे. नाशिकमध्ये आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरू आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांकडून नाशिक दौऱ्याचं आयोजन करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी नाशिक दौरा केला होता. तर आता आदित्य ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. मात्र ठाकरे गटातून शिंदे गटात मोठ्याप्रमाणात इनकमिंग होत असल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.