पाचोरा : शहरातील भडगाव रोडवरील शांतीनगर भागातील राहत्या घरात ३२ वर्षीय इसमाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज ६ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सचिन अरुण वाडेकर (वय ३२) रा. गाळण खु” ता. पाचोरा ह. मु. शांतीनगर, पाचोरा हे सुतारीकाम काम करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते. दि. १० फेब्रुवारी रोजी गाळण ता. पाचोरा येथे सचिन वाडेकर यांच्या चुलत भावाचे लग्न असल्याने परिवारीतील सर्व सदस्य हे गाळण येथे गेले होते. सचिन वाडेकर यांनी ६ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घरात कोणीही नसतांना सचिन वाडेकर यांनी भाडेतत्त्वावर असलेल्या शांतीनगर येथील राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
आकस्मिक मृत्यूची नोंद
सदरचा प्रकार दिलीप वाघ हे त्यांना कामावर जाण्यासाठी बोलविण्यास गेले असता त्यांच्या लक्षात आला. घटनेची माहिती घर मालक यांनी पाचोरा पोलिसांना दिली. पोलिस कर्मचारी व रुग्णवाहिका चालक बबलु मराठे घटनास्थळी दाखल होवून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांच्या मदतीने सचिन वाडेकर यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी सचिन वाडेकर यांना मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास हवालदार दिलीप वाघमोडे हे करीत आहेत.