भारतात अनेक तिर्थक्षेत्र असून, याठिकाणी लाखोंच्या संख्येनं भाविक दर्शनासाठी जातात. मात्र, जेष्ठ नागरिकांना तिर्थयात्रा करणे जरा अवघडच जाते. त्यामुळे जेष्ठांना आता विमानाने तिर्थयात्रा करता येणार आहे. याबाबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोठी घोषणा केली आहे. सरकारी योजनेंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मार्चपासून विमानाने तीर्थयात्रेसाठी पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मध्य प्रदेशातील भिंड येथे संत रविदास यांच्या जयंती व चंबळ विभागाच्या विकास यात्रेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, “संत रविदासांच्या जन्मस्थानाचाही या शासकीय तीर्थक्षेत्र योजनेत समावेश करण्यात येणार आहे. ती मुख्यमंत्री तीर्थ-दर्शन योजना म्हणून ओळखली जाते. आम्ही ज्येष्ठ नागरिकांनाही विमानाने तीर्थयात्रेसाठी घेऊन जाणार आहोत.”
सरकारी खर्चाने प्रवास
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’ अंतर्गत, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे पात्र ज्येष्ठ नागरिक सरकारी खर्चाने सूचीबद्ध केलेल्या कोणत्याही तीर्थक्षेत्रांना भेट देऊ शकतात. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करणारे मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना देशातील विविध राज्यांनी लागू केली आहे. 2012 मध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील वृद्ध नागरिकांसाठी तीर्थयात्रा सुरू केली होती. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन तीर्थक्षेत्रांचा समावेश सर्व धर्मीयांसाठी करण्यात आला आहे.
प्रवाशांना सुविधा मिळतात
या योजनेंतर्गत राज्यातील 60 वर्षांवरील वृद्धांना तीर्थक्षेत्रांची यात्रा करून दिली जाते. या प्रवासादरम्यान सोबत मदतनीस घेऊन जाण्याचीही व्यवस्था आहे. प्रवासात ज्येष्ठांसाठी जेवण आणि विश्रांतीची व्यवस्था केली जाते, तसेच डॉक्टरही उपचारासाठी उपस्थित असतात.