मुंंबई : काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. आता या गोंधळावरुन काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप करत पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्याचे पहायला मिळाले. आधी सत्यजीत तांबेंची बंडखोरी, त्यानंतर त्यांचा निवडणुकीत झालेला विजय यामुळे काँग्रेसमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
हायकमांडच्या निर्णयाकडे लागले लक्ष
या निवडणुकीपासून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात या दोघा नेत्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे, आणि आजच्याच दिवशी त्यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. आता या प्रकरणी काँग्रेस हायकमांड कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाना पटोले यांची प्रतिक्रिया
या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे, बाळासाहेब थोरात यांनी असा कोणताही राजीनामा दिल्याची माहिती आम्हाला मिळालेली नाही. बाळासाहेब थोरात यांची तब्येत चांगली नाही त्यामुळे ते कोणाशी बोलत नाहीत. बाळासाहेब थोरातांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देणारं ट्वीट सकाळी केलं आहे, असंही नाना पटोलेंनी सांगितलं.