जळगाव : जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी आज बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याकडे दिला. तसेच बँकेचे उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला.
जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. यामुळे नवीन अध्यक्ष नियुक्तीबाबत जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी हा निर्णय जाहीर केला होता. याबाबत त्यांनी सांगितले होते, की जिल्हा बँकेची निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीचे बहुमत झाले होते. त्यावेळी बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद एक-एक वर्षे नियुक्त करण्याचे ठरले होते. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संचालक म्हणून आम्ही अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. उपाध्यक्षपद शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे असल्याने त्यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय ते घेणार आहेत. मात्र, बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा गुलाबराव देवकर यांनी दिला आहे.
कार्यकर्त्यांशी चर्चा करुन घेतला निर्णय
दरम्यान, देवकर यांनी सांगितले, की आपल्याला निवडणुकीत मजूर सोसायटी व इतर कार्यकर्त्यांनी सहकार्य केले आहे. याबाबत आपण दिवसभर त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आता जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी नव्याने निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी जिल्हा मजूर फेडरेशनच्या कार्यालयात जाऊन राजीनामा स्वीकारला. यावेळी बँकेचे माजी संचालक वाल्मीक पाटील उपस्थित होते.