मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी आणि सोलापूर या दोन्ही वंदे भारत गाड्या या मार्गावरील सर्वात महागड्या गाड्या असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी सीएसएमटी येथून दोन्ही वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. 11 फेब्रुवारीपासून सामान्य प्रवासी या गाड्यांमध्ये बुकिंग करू शकतात.
मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वंदे भारत एक्सप्रेसपैकी मुंबई-शिर्डी वंदे भारत अधिक लोकप्रिय असू शकते. या मार्गावरील नाशिक आणि शिर्डी ही दोन्ही ठिकाणे पर्यटकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत. त्याचप्रमाणे मुंबई ते सोलापूर मार्गावरील मुंबई ते पुणे आणि पुणे ते सोलापूर विभाग लोकांमध्ये लोकप्रिय होऊ शकतात.
प्रवास भाडे किती राहणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ते पुणे दरम्यान चेअर कारचे (सीसी) भाडे 560 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार (EC) चे भाडे 1165 रुपये असू शकते. सीएसएमटी ते सोलापूर सीसीचे भाडे 965 रुपये आणि ईसीचे भाडे 1970 रुपये असू शकते. या भाड्यात केटरिंग शुल्क स्वतंत्रपणे जोडले जाईल. मुंबई ते शिर्डी CC साठी 800 रुपये आणि EC साठी 1630 रुपये मोजावे लागतील. केटरिंग सेवेसाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाईल.
ट्रेनची वैशिष्ट्ये जाणून घ्या
वंदे भारत ट्रेनबद्दल बोललो, तर सध्या भारतीय रेल्वेमध्ये धावणाऱ्या सर्व गाड्यांपैकी ही ट्रेन सर्वात आरामदायी आहे. यात प्रवाशांना विमान प्रवासाचा अनुभव मिळेल. या ट्रेनमध्ये सुरक्षेसाठी स्वदेशी बनावटीची ‘कवच’ यंत्रणा बसवण्यात आली आहे. समोरून येणाऱ्या दोन गाड्यांची टक्कर टाळण्यासाठी ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. प्रत्येक कोचमध्ये टिव्ही असेल. या ट्रेनमध्ये विमानाच्या धर्तीवर आधुनिक पॅन्ट्री आणि स्वच्छतागृहे आहेत. शिर्डीत या गाडीत शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल. 16 डब्यांच्या वातानुकूलित वंदे भारत ट्रेनला दोन एक्झिक्युटिव्ह क्लासचे डबे आहेत. संपूर्ण ट्रेनमध्ये 1128 प्रवाशांची आसन व्यवस्था आहे.