मुंबई: युवकांना राज्य सरकारसोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्रामसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पुढील 24 दिवस ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मार्च 2023 आहे. राज्याच्या विकासात योगदान देऊ इच्छिणाऱ्या तरुण आणि होतकरू मुला-मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा आहे की राज्यातील तरुणांना त्यांच्या उर्जा, धैर्य, सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानातील गतीचा उपयोग करून नवनवीन संकल्पना राबविण्यासाठी आणि प्रशासकीय प्रक्रियेला गती देण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष अनुभव देणे आहे. यासोबतच या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांना धोरणनिर्मिती, नियोजन, कार्यक्रम अंमलबजावणी यासंदर्भातील महत्त्वाचा अनुभवही मिळतो. 2015 ते 2020 या कालावधीत या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर मध्ये खंड पडला होता. आता पुन्हा हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता?
मुख्यमंत्री फेलोशिप 2023 साठी अर्ज करण्यासाठी, वय 21 ते 26 वर्षे दरम्यान असावे. 60 टक्के गुणांसह पदवी आणि एक वर्षाचा कामाचा अनुभव हा किमान निकष आहे. फेलोची निवड ऑनलाइन चाचणी, निबंध आणि मुलाखत यासारख्या त्रिस्तरीय चाचणीद्वारे गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. प्राप्त अर्जांमधून 60 तरुणांची मुख्यमंत्री फेलोशिपसाठी निवड केली जाईल. हे सर्वजण राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये आणि राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतील.
सविस्तर माहिती जाणून घ्या
IIT मुंबई आणि IIM नागपूर हे या कार्यक्रमाचे संस्थात्मक भागीदार आहेत. फेलोमध्ये या दोन्ही संस्थांमार्फत सार्वजनिक धोरणाशी संबंधित विविध विषयांचे अभ्यासक्रम पूर्ण करतील. यासाठी त्यांना आयआयटी मुंबई आणि आयआयएम नागपूर येथून स्वतंत्र पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्रे दिली जातील. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची तपशीलवार माहिती http://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP या वेबसाइटवर उपलब्ध आहे. आणखी काही माहिती हवी असल्यास, तुम्ही [email protected] वर ईमेल करू शकता किंवा हेल्पलाइनवर कॉल करू शकता. 8411960005 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती घेऊ शकता.