हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अदानी उद्योग समूह वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या अहवालानंतर अदानी उद्योग समुहाच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. दरम्यान, आता अदानी समुहाला आणखी मोठा धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या सिमेंट वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क आणि कर विभागाने अदानी समूहाच्या कंपन्यांवर छापे टाकले आहेत.
हिमाचल प्रदेशातील अदानी विल्मार ग्रुपच्या कंपन्यांवर या पथकांनी धाडी टाकल्या. उत्पादन शुल्क विभागाच्या दक्षिण अंमलबजावणी विभागाचे पथक बुधवारी सायंकाळी उशिरा परवानू येथील अदानीच्या स्टोअरमध्ये पोहोचले जेथे अदानी समूहाच्या रेकॉर्डची छाननी करण्यात आली. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाला मोठा धक्का बसला आहे. अदानी समूहाचे शेअर्स कोसळले. मात्र, बुधवारी काही प्रमाणात रिकव्हरी पहायला मिळाली. स्टॉक खाली आल्यानंतर गौतम अदानी जगातील अव्वल श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले. अदानी मुद्द्यावरून विरोधक सातत्याने सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, हिमाचलमधील अदानी ग्रुपच्या कंपन्यांवर आता छापेमारी सुरु झाली आहे.
शेअर्समध्ये सातत्याने घसरण
अमेरिकन रिसर्च कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने 24 जानेवारीला अदानी ग्रुपवर फसवणुकीचा आरोप करत अहवाल जारी केला होता. हा अहवाल आल्यापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत आहे. तथापि, बुधवारी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 19.76 टक्क्यांनी वाढ दर्शवत 2,158.65 रुपयांवर बंद झाले. यासह, अदानी समूहाच्या कंपनीचे बाजार भांडवल 40,601.14 कोटी रुपयांनी वाढून 2.46 लाख कोटी रुपये झाले आहे.
विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न
अदानी समूहाशी संबंधित आरोपांना उत्तर न दिल्याने विरोधी पक्षांनी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर अदानींना वाचवल्याचा आरोप केला. लोकसभेत संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, भारतातील जनता नकारात्मकता स्वीकारू शकत नाही. त्याच्यावर लावलेल्या ‘खोट्या आरोपांवर’ कधीही विश्वास ठेवणार नाही.