मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबईत दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. एक ट्रेन मुंबई ते सोलापूर आणि दुसरी मुंबई ते शिर्डी धावेल. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, आज देशभरात वंदे भारत ट्रेनला वाढता प्रतिसाद मिळत आहे. मुंबईला आज दोन वंदे भारत ट्रेन मिळत आहेत. आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे. यातून श्रद्धेची केंद्रे जोडली जातील. यामुळे प्रवाशांसह शेतकरी, भक्तांची आणि विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना सुविधा होणार आहे. तसेच पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांना चालना मिळणार आहे.
आता देशभरात 10 वंदे भारत ट्रेन धावू लागल्या आहेत. मुंबई, नाशिक आणि पुण्याच्या पर्यटनाला चालना मिळेल, असे पंतप्रधान म्हणाले. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आधुनिक भारताचे हे एक अद्भुत चित्र आहे. वंदे भारत ट्रेन ही देशासाठी स्पीड आणि स्किल या दोन्हींचे प्रतिबिंब आहे. देशातील 17 राज्यांतील 108 जिल्हे वंदे भारत एक्सप्रेसने जोडले गेले आहेत. एक काळ असा होता की आमच्या भागात ट्रेनला थांबा मिळावा म्हणून खासदार पत्र लिहायचे. आता देशातील खासदार वंदे भारत ट्रेन चालवण्याची मागणी करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
एलिव्हेटेड कॉरिडॉरचे उद्घाटन
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज मुंबईत एलिव्हेटेड कॉरिडॉरचे उद्घाटन करण्यात आले आहे, जो पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी पूर्ण करेल. मुंबईतील रहिवासी याची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. दररोज 2 लाखांहून अधिक वाहने ये-जा करू शकतील आणि लोकांचा वेळ वाचणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
दोन्ही गाड्यांचे असे आहेत थांबे
– ट्रेन क्रमांक 22223 मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी 6.20 वाजता CSMT हून सुटेल आणि साईनगर शिर्डी येथे सकाळी 11.40 वाजता पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, नाशिक रोड स्थानकावर थांबेल. तर 22224 साईनगर शिर्डी-मुंबई एक्स्प्रेस शिर्डी येथून सायंकाळी 5.25 वाजता रवाना होऊन मुंबईला रात्री 10.50 वाजता पोहोचेल.
– ट्रेन क्रमांक 22226 सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरहून सकाळी 6.05 वाजता सुटेल आणि मुंबईला दुपारी 12.35 वाजता पोहोचेल. ही ट्रेन कुर्डुवाडी, पुणे, कल्याण, दादर, सीएसएमटी येथे थांबेल. तर ट्रेन क्रमांक 22225 मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सायंकाळी 4.05 वाजता सीएसएमटीवरून सुटेल आणि सोलापूरला रात्री 10.40 वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्या आठवड्यातून सहा दिवस धावतील.
वंदे भारत एक्सप्रेस तिकीट दर किती ?
मुंबई ते पुणे चेअर कारसाठी 560 रुपये ते एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1135 रुपये, मुंबई ते सोलापूर चेअर कारसाठी 965 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1970 रुपये, मुंबई ते नाशिकसाठी चेअर कार 550 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1150 रुपये, मुंबई ते शिर्डी चेअर कार 800 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्ट साठी 1630 रुपये मोजावे लागणार आहेत. तर वंदे भारत एक्सप्रेस दादर, ठाणे आणि नाशिकरोड येथे थांबेल. इगतपुरी ते पुणतांबा दरम्यान ही ट्रेन ताशी 110 किमी वेगाने धावेल.