जळगाव – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सायबर क्राईमच्या घटना समोर येत आहेत. आता अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका व्यक्तीकडून तब्बल ५ लाख ८१ हजार ८० रुपये उकळण्यात आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील एका नोकरदार व्यक्तीला त्याच्या व्हाटसअॅप क्रमांकावर दि. ४ ते ८ फेब्रुवारीच्या दरम्यान अनोळखी क्रमांकावरुन व्हीडीओ कॉल आले होते. या व्यक्तीचा नग्न व्हिडीओ व्हायरल झाल्याचे त्याला सांगण्यात आले. हा व्हिडीओ डीलीट करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली. तसेच व्हिडीओ डीलीट न केल्यास आपण आयपीएस बोलत असल्याचे सांगत कायदेशीर कारवाईची धमकी देण्यात आली.
विविध बँक खात्यावर पैसे पाठवले
घाबरलेल्या नोकरदाराने व्यक्तीने फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीच्या विविध बॅंकाच्या खात्यावर ५ लाख ८१ हजार ८० रुपये ऑनलाईन पाठवले. त्यानंतरही त्यांनी पैशांची मागणी सुरुच ठेवली. शेवटी पिडीत व्यक्तीने व्हाटसअॅप मेसेज आणि बनावट नावे सांगून पैशांची मागणीसह धमकी देणाऱ्या तिघांविरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. लिलाधर कानडे हे करत आहेत.