जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळात तब्बल ५०० किलो गांजा पकडला आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ७५ लाखांचा गांजा, नऊ लाखांचे इलेक्ट्रिक साहित्य, दहा लाख रुपयांच्या आयशर वाहनासह एकूण ९४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भुसावळ शहरात बाहेर गावावरून एक वाहनामध्ये गांजा येत असल्याची गोपनीय माहिती एल.सी.बी.चे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाली असता, त्यांनी तत्काळ पथक भुसावळला रवाना करून जळगांव रोडवर सापळा लावण्यास सांगितले होते. जळगांव रोडवरील जॉली पेट्रोल पंपाजवळ पुलाखाली एक वाहन बरेच वेळ थांबलेल्या अवस्थेत दिसते. पथक पाहणी करण्यासाठी गेले असता वाहनांमध्ये ड्रायव्हर नव्हता. पोलिसांनी हे वाहन भुसावळ तालुका पोलील स्टेशनला आणले.
वाहन चालकाला घेतले ताब्यात
पथकाने केलेल्या चौकशीत वाहनात गांज्याच्या १६ बॅग पाच किलो वजनाचे असे चाळीस गठ्ठे एकूण ५०० किलो ६०० ग्रॅम असा ७५ लाख रुपयांचा गांजा, नऊ लाखांचे इलेक्ट्रिक साहित्य मिळून आले. पथकाने दहा लाख रुपयांच्या आयशर वाहनासह सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. वाहनातील चालकाला स्थानिक गुन्हे शाखा पथकातील उपनिरीक्षक गणेश चौबे, कर्मचारी सचिन महाजन, प्रमोद लाडवंजारी, अक्रम शेख अशांनी मालेगाव येथून ताब्यात घेतले.