पुणे: शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे गटाने भाजपासोबत सरकार स्थापन केले. यानंतर शिंदे गटाने पक्षाचे चिन्ह असलेल्या ‘धनुष्यबाण’वरही दावा केला आहे. या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. आता या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठं भाकित केलंय.
पुणे दौऱ्यावर असलेल्या नारायण राणे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, मी न्यायालयातील प्रकरणांवर कधी बोलत नाही. राज्यातील सत्तासंघर्ष निकाल कोणाच्या बाजूने येणार हे सांगतो. उद्धव ठाकरे ज्या चिन्हासाठी भांडत आहेत, ते त्यांच्या हातून जाऊन शिंदे यांच्या हाती येणार आहे ही ब्रेकिंग न्यूज टाका, असे नारायण राणे यांनी म्हणाले.
पुण्यात दोन्ही जागा आमच्याच
पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत राणे म्हणाले, “ या दोन्ही पोटनिवडणुकीच्या जागा आमच्याच असून आम्ही दोन्ही जागा मोठ्या मताधिक्क्याने जिंकणारच आहोत. विरोधक धुळीसारखे उडणार असून मतदार हेच दाखवून देतील. कारण भाजपा ग्रामपंचायत ते लोकसभा बरोबर कोणतीही निवडणूक गांभीर्याने घेऊन त्यांना सामोरे जातो असेही त्यांनी सांगितले.
शिवसेना नेत्यांवर टीका
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत, अजित पवार यांच्यावर टीका केली. यावेळी राणे यांना वारीसे मृत्यूप्रकरणातील आरोपीचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या फलकावर फोटो होते, असे विचारले. त्यावरही राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राणे म्हणाले, आजकाल कुणीही फोटो लावतो. शिवसेनावाले तर वडिलांचाही फोटो लावत नाहीत. ते विसरले वडिलांना.