मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाला आहे. त्यामुळे भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदावरुन पायउतार झाले आहेत. त्यांच्या जागी आता महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर रमेश बैस येणार असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील 13 राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले होते. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढले होते. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली होती. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता. महाविकास आघाडीने तर राज्यपालांच्या विरोधात मोठा मोर्चाही काढला होता. तसेच राज्यात ठिकठिकाणी राज्यपालांचे पुतळे जाळून आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी विरोधकांनी राज्यपालांच्या हकालपट्टीची जोरदार मागणी केली होती.
पंतप्रधान मोदींकडे दिला होता राजीनामा
वादग्रस्त विधानावरून राज्यपाल कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका झाली होती. यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई दौऱ्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवण्यात आला होता. अखेर कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याची विरोधकांनी मागणी लावून धरली होती. अखेर राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर विरोधकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.