जळगाव : एका राजकीय प्रकरणा संबंधित चौकशीसाठी सीबीआयचे पथक जळगाव शहरात दाखल झाले होते. या पथकाकडून एका राजकीय गुन्ह्याशी संबंधित तपास सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सीबीआय पथकाच्या एन्ट्रीमुळे जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. मविप्र संचालक अॅड.विजय भास्कर पाटील यांना धमकावून खंडणी वसुल केल्याप्रकरणी सीबीआयच्या पथकाने जाबजवाब नोंदविले आहेत.
मविप्र प्रकरणात मंत्री गिरीश महाजन यांच्यासह 31 जणांविरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल होवून तो कोथरूडला वर्ग करण्यात आला होता. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अॅड.प्रवीण चव्हाण यांच्याशी संबंधित पेनड्राईव्ह बॉम्ब सभागृहात फोडल्यानंतर या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. सीबीआयकडे या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या गुन्ह्याच्या तपासार्थ सीबीआयचे पथक जळगावात धडकले असून या पथकाने नूतन मविप्र संस्थेच्या कार्यालयातून जावून माहिती घेतली. पथकाने निंभोऱ्यातील गुन्ह्याप्रकरणी काही संचालकांचे जाब-जवाब नोंदवले.
मविप्र संस्थेत घेतली माहिती
पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यासह डीवायएसपी, पोलीस निरीक्षक दर्जाचे प्रत्येकी एक अधिकारी आणि पाच कर्मचारी असे 11 अधिकाऱ्यांचे पथक जळगावात आले होते. त्यांनी स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त घेत मविप्र संस्थेच्या कार्यालयात जावून काही कागदपत्रांची माहिती घेतली. तसेच काही संचालकांचे जाब-जवाबही नोंदवल्याचे समजते. सीबीआयचे पथक जळगाव आल्याच्या वृत्ताला पोलिस सूत्रांनी देखील दुजोरा दिला आहे.
पेनड्राईव्ह बॉम्ब अन मविप्रचा गुन्हा
देवेंद्र फडणवीसांनी अॅड.प्रवीण चव्हाण यांच्याशी संबंधित पेनड्राइव्ह बॉम्ब सभागृहात फोडल्यानंतर मंत्री गिरीश महाजनांविरुद्ध केसेस कशा दाखल केल्या?, महाजनांना कसं फसवलं?, अगदी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना कसं फसवायचं आहे? ह्या सर्व षडयंत्राचं चित्रीकरण पेन ड्राईव्हमध्ये असल्याचा दावा करीत सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी विधानसभेत केली होती तर सरकार बदलल्यावर हे प्रकरण हे सीबीआयकडे गेले शिवाय निंभोरा येथील गुन्ह्यातही मंत्री महाजन यांचे नाव असल्याने या अनुषंगाने सीबीआय पथक जळगावात आल्याची माहिती असून काही संचालकांचे जाबजवाब नोंदवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.