पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी 10 मिनिटे प्रश्नपत्रिका वाचनासाठी देण्याची सुविधा यंदाच्या परीक्षेपासून रद्द करण्यात आल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे. मात्र यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावर असा निर्णय घेतल्याने त्याचे परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होतील, अशा प्रतिक्रियाही पालकांमधून आणि शिक्षकांमधून उमटत आहेत.
बोर्डाच्या परीक्षेत पेपर सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका सोशल मिडीयावर व्हायरल होण्याचे प्रकार घडले आहेत. तसेच पेपरफुटीच्याही चर्चा होतात. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडण्यासाठी आता परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी 10 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात 11 वाजता, तर दुपारच्या सत्रात 3 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकेचे वाटप सुरू होणार असल्याचे बोर्डाने म्हटले आहे.
वेळेपूर्वी अर्धातास उपस्थितीचे बंधन
राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी परीक्षेच्या वेळेपूर्वी अर्धा तास परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. त्याबाबत प्रवेशपत्रावरही नमूद केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात साडेदहा वाजता आणि दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
पेपर समजण्यासाठी वेळ देणे गरजेचे
मंडळाने पेपरच्या आधी अर्धा तास उपस्थिती बंधनकारक केली आहे. मात्र त्यामध्ये दहा मिनिटे आधी पेपर दिला जाणार नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात केवळ भीतीच निर्माण होईल. कोरोना काळातील विद्यार्थ्यांच्या लिखाणावर परिणाम झालेला असताना पेपर समजण्यासाठी त्यांना अधिकचा वेळ देणे गरजेचा आणि वेळ कमी करणे चुकीचे असल्याचे मत पुणे विद्यार्थी गृह विद्याभवनचे संचालक दिनेश मिसाळ यांनी व्यक्त केले आहे.