लासलगाव: रेल्वे इलेक्ट्रिक लाईनचे काम करणाऱ्या टॉवर गाडीने रुळावरच काम करणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांना चिरडल्याची भीषण दुर्घटना लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. आज सकाळी 6 वाजेच्या दरम्यान ही घडना घडली. या घटनेत चारही कर्मचारी जागेवरच ठार झाले. कर्मचाऱ्यांना रेल्वेने उडवल्याने संतप्त झालेल्या चतुर्थ श्रेणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वेच्या चालकावर लासलगाव रेल्वे स्थानकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लासलगाव पोलिसांनी रेल्वे चालकाला सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी हलवले. आता संतप्त कर्मचाऱ्यांनी रेल रोको आंदोलन सुरू केले आहे.
रेल्वे लाईनची काम करणारी दोन डब्यांची रेल्वे टॉवर ही लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ सकाळी सहा वाजता उभी होती. या टॉवर गाडीला लासलगावहून पुन्हा उगावच्या दिशेने काम करण्यासाठी जायचे होते. रेल्वे पोल नंबर 230 /231 च्या दरम्यान या गाडीला काम करायचे होते. या ठिकाणी रेल्वेचे ट्रॅकमेन कामासाठी हजर होते. त्यांचे काम सुरू होते. मात्र, टॉवर गाडी ही डाऊनलाईननेच उगाव दिशेकडे गेल्याने या कर्मचाऱ्यांना काही समजायच्या आत गाडीने त्यांना चिरडले. त्यामुळे चौघे कर्मचारी जागीच मृत्युमुखी पडले.
अपघातातील मृतांची नावे
संतोष भाऊराव केदारे (वय 38 वर्षे), दिनेश सहादु दराडे (वय 35 वर्षे), कृष्णा आत्मराम अहिरे (वय 40 वर्षे), संतोष सुखदेव शिरसाठ (वय 38 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व कर्मचारी ट्रॅक मेंटनर या पदावर काम करत होते.
कर्मचाऱ्यांनी रेल रोको आंदोलन
घटनेमुळे रेल्वेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. संतप्त झालेले कर्मचारी रेल्वे विरोधात घोषणाबाजी करीत होते. या घटनेविरोधात व चालकाविरोधात संतप्त रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल रोको आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांनी रेल्वे गाड्या रोखून धरल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. मात्र, 20 मिनिटानंतर गोदावरी एक्सप्रेस रवाना करण्यात आली. त्यानंतर पुन्हा कर्मचाऱ्यांनी रेल रोको आंदोलन सुरू केले आहे.