पुणे: पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या फोन कॉलमुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या गुगलच्या ऑफिसमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल आला होता. कोरेगाव पार्क येथील गुगल ऑफिसच्या बिल्डिंग मध्ये बॉम्ब ठेवल्याचा फेक कॉल काल एका व्यक्तीने केला होता.
मुंबईतील गुगल ऑफिसमध्ये एक फोन कॉल आला होता. यात पुण्याचे गुगल ऑफिस उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून काल रात्री संपूर्ण बिल्डिंगची तपासणी करण्यात आली. यावेळी कुठलीही वस्तू संशयास्पद आढळून आली नाही, त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
पोलिसात गुन्हा दाखल
याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी हैद्राबाद येथील पणयम बाबू शिवानंद नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बीकेसी येथील गुगल इंडियाच्या दूरध्वनीवर रविवारी दूरध्वनी आला होता. त्या शिवानंदने केलेल्या या दूरध्वनीत त्याने पुणे गुगलच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली होती. गुगलच्या वतीने दिलीप तांबे यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात धमकीची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी शिवानंदविरोधात गुन्हा दाखल केला आहे.