नागपूर राजमुद्रा वृत्तसेवा | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. याआधी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर अवघ्या महिनाभरातच ईडीनेही देशमुखांच्या नागपुरातील घरावर धाड टाकली आहे. विशेष म्हणजे कालच भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौकशी करण्याचा ठराव झाला होता. त्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापे टाकल्यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे.
अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. ईडीने आज सकाळी पावणे आठच्या सुमारास देशमुखांच्या नागपुरातील घरावर छापेमारी केली. यावेळी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात होते. पाच अधिकाऱ्यांमार्फत हे धाडसत्र सुरु झाले. यावेळी अनिल देशमुख घरी नव्हते, तर त्यांची पत्नी आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही सीबीआय चौकशी करावी, असा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब संदर्भात अजित पवार आणि शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब यांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.