जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | ओबींसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा राज्यात चिघळत जातोय, त्याच धर्तीवर खडसे कुटुंबातील नणंद भावजयी या एकमेकांच्या समोर उभ्या ठाकलेल्या दिसत आहेत. त्यामुळे खडसे कुंटुंबीयांमध्येच दोन गट पडलेले दिसून येत आहेत. जळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनी ओबीसीच्या मुद्द्यावर भाजपवर टीका केल्यानंतर, प्रतिउत्तर देत खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, भाजपने ओबीसी आरक्षण दिले म्हणूनच आम्ही या पदावर आलो.
ओबीसींचे राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने २६ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या आधीच ॲड. रोहिणी खडसे यांनी गुरुवारी ट्विट करत, ‘भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. या शब्दात त्यांनी टीका केली आहे.
भाजपच्या खासदार रक्षा खडसेंनी जळगावातील भाजपच्या बैठकीत त्यांना उद्देशून. ‘भाजपने जर ओबीसींचा विचार केला नसता तर कदाचित आमच्यासारख्या ओबीसी नेत्यांना संधी मिळाली नसती. त्यांनाही भाजपने विधानसभेची संधी दिली नसती’, असे बोलत रोहिणी खडसे यांना प्रतिउत्तर दिले.