राजमुद्रा वृत्तसेवा | लग्न म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो नयनरम्य सोहळा. थाटमाट, भली मोठी वरात,बँड आणि नाचून जल्लोष साजरे करणारे नातेवाईक व मित्रमंडळी. पण उत्तर प्रदेशातील महोबामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाचे संपूर्ण विधी जवळपास पूर्ण झालेले असताना खुद्द नवरीनेच आपलं लग्न मोडलं. सप्तपदी घेत असताना सहाव्या फेऱ्यानंतर तरुणी थांबली आणि तिनं लग्न करण्यास साफ नकार दिला. त्यामुळे उपस्थित वऱ्हाडींना धक्का बसला. यानंतर रात्री पंचायत बोलावण्यात आली. मात्र जमतील ते प्रयत्न करूनही तरुणी तिच्या मतावर ठाम राहिली. त्यामुळे नवरा मुलगा नवरीशिवाय माघारी परतण्याची वेळ आली.
गुरुवारी उत्तर प्रदेशमधल्या महोबामध्ये झाशीच्या कुलपहाड तहसीलमधील एका गावातून एक वरात आली होती. मुलीकडच्यांनी नवऱ्या मुलाकडच्यांचं जोरदार स्वागत केलं. ढोल-नगाऱ्यांच्या तालात वराती मंडळींनी ताल धरला. यानंतर लग्नाचे विधी संपन्न होऊ लागले. नवरा-नवरीनं एकमेकांच्या गळ्यात हारही घातला. दोन्ही बाजूंनी फोटो काढले. त्यानंतर सात फेरे घेण्यास सुरुवात झाली. मात्र सहा फेरे होताच नवरी थांबली आणि तिनं लग्नास नकार दिला.
सातवा फेरा शिल्लक असताना नवरी अचानक थांबल्यानं उपस्थितांना धक्काच बसला. नातेवाईकांनी मुलीला लग्न मोडण्याचं कारण विचारलं. त्यावर ‘मला नवरा आवडला नाही. त्यामुळे मी लग्न करणार नाही,’ असं उत्तर मुलीनं दिलं. मुलीनं सहाव्या फेऱ्यानंतर अचानक लग्न मोडल्यानं नातेवाईक पाहातच राहिले. मला या मुलाशी लग्न करायचं नाही, असं म्हणत तिनं लगीनगाठ सोडली आणि स्वत:च्या खोलीत निघून गेली. हा संपूर्ण प्रकार पाहून सगळ्यांनाच आश्चर्य झाले.