जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे व जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांना एकाने ट्विटरवरून अर्वाच्य शब्दात शिवीगाळ केली असून, याविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अशोक लाडवंजारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या तथा जिल्हा बँकेचे अध्यक्षा रोहिणी खडसे यांना सपोर्ट युथ नावाच्या ट्विटर धारकाने गुरुवारी (ता २४) ॲटदरेटनगमा२१६ (@nagma216) या अकाउंट वरून अपशब्द वापरत शिवीगाळ असलेला मजकूर ट्विटरवर प्रसिद्ध केला. रोहिणी खडसे यांनी नुकतेच ‘भाजपला ओबीसी आरक्षणाचा कळवळा कधीपासून?’ असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावर व्यक्त होताना या ट्विटर धारकाने अपशब्द वापरत ट्विट केले असून त्याच्याविरोधात अशोक लाडवंजारी यांच्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यासंदर्भात पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करत आहेत.