अमळनेर : अमळनेर पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश करीत एका आरोपीच्या मुसक्या बांधल्या तर अंधाराचा फायदा घेत पाच संशयित पसार झाले. या प्रकरणी अमळनेर पोलिसात सहा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील आरोपीकडून दुचाकीसह मोबाईल, मिरची पूड, नॉयलॉन दोरी व चाकू असा 74 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस गस्तीवर असताना शहरातील विजय मारोती मंदिर परीसरातील हॉटेल बलराम जवळील परीसरात अंधाराचा फायदा घेत मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास सहा संशयित दरोड्याच्या साहित्यासह उभे असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी धाव घेतली.
यांच्या विरोधात गुन्हा दाखल
यावेळी पोलीस येताच पाच संशयित अंधाराचा फायदा घेत पसार झाले तर त्यातील जगदीश पुंडलिक पाटील यास पकडण्यात यश आले. या प्रकरणी जितेंद्र निकुंभ यांच्या फिर्यादीवरून जगदीश पाटीलसह दिनेश भोई, प्रेम पाटील, अजय अंबे (तिघे रा.पिंपळकोठा करडोणे, रा.मुंबई) आणि भटू दिलीप पाटील (रा.पैलाड, अमळनेर) यांच्याविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख करीत आहे.