मुंबई – राष्ट्रवादी राष्ट्रवादासोबत येत असेल तर त्यात अडचण काय? आम्ही स्वत: राष्ट्रवादासोबत आहोत. जर ते राष्ट्रवादाच्या दिशेने येत असतील तर त्यांचे स्वागत करायला हवं असं विधान भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. राज्यात महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. त्यात शरद पवार यांच्या भूमिकेची राज्यात भलतीच चर्चा सुरू झाली आहे. त्यात आता भाजपाच्या प्रमुख नेत्याने राष्ट्रवादी-भाजपा एकत्र येण्यावर केलेले विधान महत्त्वाचे ठरत आहे.
मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, देशाच्या हितासाठी राष्ट्रवादी चर्चा करत असेल तर त्यांचे स्वागत करायला हवे. जर उद्धव ठाकरेंसोबत न जाता ते देशहिताच्या मार्गावर चालणार असतील तर त्यात आमची काहीही हरकत नाही. मार्ग मोठा आहे एक पाऊल त्यांच्याकडून पुढे यायला हवं. मग पाहूया. पुढे काय होते? महाराष्ट्रात जानेवारी, फेब्रुवारीत समीकरण बदलतील. काँग्रेस स्वत: वेगळी होईल असा दावाही त्यांनी केला.
शरद पवारांची भूमिका काय आहे?
महाराष्ट्रात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. शरद पवारांची विधाने आणि मोदी डिग्री, अदानींबाबत घेतलेली भूमिका यावरून राष्ट्रवादी-भाजपा एकत्र येतील का अशी चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीत तिन्ही पक्षात मतभेद आहेत. परंतु सर्वांनी एकविचाराने काम करायला हवं. कार्यक्रम असतील त्यात सर्वांनी सहभागी व्हायला हवं असं शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत ठरले. तर अजित पवारांनी नाना पटोलेंना माध्यमांकडे न जाता आधी आमच्याशी चर्चा करा असा सल्ला दिला.