बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाचा छापा पडला आहे. आज सकाळपासून जीएसटीचे अधिकारी पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात पोहोचले आहेत. येथील आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरु आहे.
केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्या प्रकरणी ही चौकशी सुरु असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच जीएसटी विभागाकडून ही कारवाई होत असल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपविरोधी नेत्यांवरच केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई होते, त्यांच्याच चौकशा होतात, असा आरोप विरोधी पक्षांकडून नेहमी करण्यात येतोय. आता भाजप नेत्या आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्याच साखर कारखान्यावर छापेमारी झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
बहीण भाऊ आले एकत्र
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाची छापेमारी सुरु आहे. मात्र नेमकी कोणत्या कारणासाठी ही चौकशी सुरु आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. तर काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमासाठी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र दिसले होते. आजदेखील धनंजय मुंडे, पंकजा मुंडे या नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. मात्र इकडे परळीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाची छापेमारी सुरु आहे.