जळगाव : शिंदे गटातील अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता आहे, नाराजी आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, त्यामुळे अनेक आमदार हे नाराज आहेत. त्यामुळे जशा जशा निवडणुका जवळ येतील. न्यायालयाचा निकाल लागेल. ज्याप्रमाणे जहाजातून एक एक उंदीर बाहेर पडतो; तसे तसे शिंदे गटातून हे आमदार बाहेर पडतील, असे वक्तव्य आमदार एकनाथ खडसे यांनी केले आहे.
एकनाथ खडसे बुलढाणा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात शिंदे गटातील अनेक नेत्यांनी दांडी मारली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे. एकनाथ खडसे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांबरोबर अयोध्येला अनेक आमदार गेले नाहीत. आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. अपक्ष आमदारांमध्येही अस्वस्थता आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होत नाही. मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं नेहमी गाजर दाखवलं जातं आहे. त्यामुळे बच्चू कडूंसारखे आमदार अनेकदा विधानं करत आहेत. अनेक आमदार खासगीमध्ये बोलताना सरकारबाबत नाराजीची भावना व्यक्त करत आहेत. त्यामुळे जेव्हा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील आणि कोर्टाचा निकाल लागेल. तेव्हा जहाजातून उंदीर जसे पळतात, त्याप्रमाणे हे सगळे आमदार हळुहळू शिंदे सरकारला सोडून जातील,” असं भाकीत एकनाथ खडसे यांनी केलं.
अजितदादा भाजपमध्ये जाणार?
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशा विषयी चर्चा सुरू आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी खुलासा केला आहे. माझं अजित पवार यांच्याशी बोलणं झालं आहे. दादा कुठेही जाणार नाही. त्यांना बदनाम करण्याचं काम सुरू आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. अजितदादा भाजपमध्ये जाण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. माझं त्यांच्याशी बोलणं झालं. ते कोणत्याही परिस्थितीत पक्ष सोडणार नाहीत. त्यांना बदनाम करण्यासाठी वारंवार या बातम्या दिल्या जातात, असं एकनाथ खडसे म्हणाले.