पुणे : मुलाच्या आजारपणाला कंटाळून व त्याच्या औषधांचा खर्च परवडत नसल्याने बापानेच स्वतःच्या 28 वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्याच्या हडपसर परिसरातील काळेपडळ येथील केतकेश्वर कॉलनीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत बाबुराव जायभाय (वय 28) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. आरोपी वडील बाबुराव दिनकर जायभाय (वय 50) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत मुलाची आई सुनिता बाबुराव जायभाय (वय 45) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. सहा महिन्यापूर्वी अभिजीत जायभाय याच्या डोक्यात मार लागला होता. त्यामुळे तो अंथरुणाला खिळून होता. त्याची आई सुनीता ही घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. तर, वडील बाबूराव जायभाय हा हमालीचे काम करतो. बाबूराव याला दारुचे व्यसन असून, तो घरखर्चासाठी पैसे देत नव्हता.
घरात कुणीही नसताना केली हत्या
तरुण पोरगा काही काम न करता घरात झोपून असल्यामुळे पती-पत्नी सतत वाद होत होते. आरोपी बाबुराव जायभाय हा त्याचा जगून काही उपयोग नाही, आज ना उद्या हा मरणारच आहे” असे वारंवार बोलायचा. यातून नवरा बायको दोघात वाद व्हायचे. दरम्यान आजारी असल्याने अभिजीत याचा रुग्णालयाचा खर्च देखील वाढत होता. हाच राग मनात धरून आरोपी वडिलांनी घरात कुणीही नसताना गळा आवळून मुलाची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.
पोलिसांनी केली घटनास्थळी पाहणी
दरम्यान घर कामाला गेलेल्या सुनिता जायभाय घरी परत आल्यानंतर हा सर्व प्रकार त्यांचा लक्षात आला. त्यांनी पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे निरीक्षक दिगंबर शिंदे आणि विश्वास डगळे, युनिट 5 चे निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी वडिलांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वास डगळे करत आहेत.