नागपूर : राज्यात शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर शिवसेना पक्ष दोन गटांमध्ये विभागला गेला. त्याचप्रमाणे आता राष्ट्रवादी काँग्रेस सोबत भाजपकडून तोच प्रयोग केला जात असल्याचा खळबळ जनक दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबाव तंत्राचा वापर करून हे कारस्थान केलं जाईल अशी शंका राऊत यांनी उपस्थित केली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून पक्षात अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते काही आमदारांसह भाजपात प्रवेश करणार असल्याचेही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट केल्याने खळबळ उडाली होती. अशा परिस्थितीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी या विषयावरून मोठ विधान केलं आहे.
राज्यात ईडीचा गैरवापर सुरु
ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील नेत्यांवर आधी ईडीची कारवाई करून अटकेची भीती दाखवली, तशाचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरही ईडी कारवाई होत आहे. तोच प्रयोग राष्ट्रवादीबरोबर सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. यापूर्वी संजय राऊत यांनी अजित पवार जर भाजप सोबत गेले तर त्यांचा मिंधे होईल असे म्हंटले आहे. त्यामुळे संजय राऊत वारंवार अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भाजपसोबत जाईल या अनुषंगाने भाष्य करत आहे. आता नागपूर दौऱ्यावर असतांना राऊत यांनी मोठा संशय व्यक्त केला आहे.