मुंबई : ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ सन्मानाने गौरविण्यात आले. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा पार पडला. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातील लाखो श्री सदस्य खारघरमध्ये दाखल झाले होते. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबीय उपस्थित होते.
यावेळी त्यांना सन 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, मानपत्र आणि 25 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करून आप्पासाहेबांना सन्मानित करण्यात आले. मात्र अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुरस्कारात मिळालेली मानधनाची 25 लाख रूपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिल्याची मोठी घोषणा केली.
एकाच घरात दोनवेळा पुरस्कार
अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुरस्कार स्वीकारताना मनोगत व्यक्त केले. तेव्हा ते म्हणाले की, मला मिळालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारचे श्रेय हे आपल्या सर्वांना जाते. एका घरात दोन वेळा पुरस्कार दिला जातो अशी घटना कुठेही झाली नाही. आम्ही कामाची सुरुवात ही खेडेगावापासून सुरु केली. मी प्रसिद्धीपासून लांब आहे. वस्तू महत्वाची असेल तर तिची जाहीरात करायची गरज काय आहे. नानासाहेब वयाच्या 87 वर्षापर्यंत काम करत होते. माझा श्वास असेपर्यंत हे कार्य सुरु राहणार आहे.