मुंबई : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार का, अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घटनाही याचीच साक्ष देत आहेत. अजित पवारांचे अचानक गायब होणे असो किंवा भाजपविरोधात मवाळ भूमिका घेण्याचा मुद्दा असो. खुद्द संजय राऊत यांनीही सामनामध्ये लिहिले आहे की, अजित पवारांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. मात्र, राष्ट्रवादी हा पक्ष म्हणून कधीही भाजपसोबत जाणार नाही, असे शरद पवार यांनी निश्चितपणे सांगितले आहे. एखाद्याने वैयक्तिक निर्णय घेतला तर तो वेगळ भाग आहे.
यासंदर्भातील ताज्या घडामोडींवर नजर टाकली तर आज पुन्हा अचानक अजित पवारांचे दिवसभराचे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले. दुसरीकडे, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज अचानक दिल्लीला रवाना झाले. एका महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते दिल्लीला गेल्याचे बोलले जात आहे. बावनकुळे यांच्यासह आमदार आशिष शेलारही दिल्लीला गेले आहेत. दोन्ही नेते अमित शहा यांची भेट घेणार असल्याचीही चर्चा आहे. आता या दोन्ही घटनांचा राज्याच्या राजकारणात संबंध जोडला जात आहे.
शेतकरी मेळाव्यात मारली दांडी
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आज पुण्याला जाणार होते मात्र ते अजूनही मुंबईतच आहेत. अजित पवार यांचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला येणार नसल्यामुळे आयोजकांनी आयत्या वेळी शरद पवार, सुप्रिया सुळेंना निमंत्रित केलं. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय.
अजित पवारांच्या मनात चाललंय तरी काय?
अजित पवार हे वेळेचं बंधन पाळणारे नेते आहेत. अनेक ठिकाणी ते वेळेच्या पूर्वीच हजर होतात. मात्र दादांनी पुणे दौरा रद्द केल्याने अनेक चर्चा होत आहे. दौरा रद्द होणे हे नवे नसले तरी गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहिल्या तर अजित पवारांच्या मनात नक्की काय चाललंय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मागच्यावेळीही अजित पवार यांचा पुणे दौरा रद्द झाला, ते नॉट रिचेबल झाले तेव्हा प्रकृतीच्या कारणास्तव ते बाहेर आले नाहीत असं सांगण्यात आले. मात्र आज नियोजित कार्यक्रम रद्द केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.