मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत सध्या 15च्या आसपास आमदार जायला तयार आहेत, यात पक्षातील काही बड्या नेत्यांचाही समावेश आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 आमदारांपैकी 40 आमदारांच्या सह्या घेतल्या असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच या आमदारांच्या सह्याचं पत्र घेऊन अजित पवार राज्याचे राज्यपाल यांना भेटण्याची चर्चा देखील रंगली आहे.
‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीतून 53 पैकी 40 आमदार असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नव्हे, तर या 40 आमदारांच्या सह्यांचं पत्रही अजित पवारांच्या गटाकडे असल्याचं वृत्त सध्या प्रसिद्ध करण्यात आलं आहे. दरम्यान एकिकडे अजित पवार समर्थक आमदार मुंबईच्या दिशेनं निघाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र अजित पवारांनी एक ट्विट केलं आहे. आपण मंगळवारी आमदारांची बैठक बोलवल्याच्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या, पण त्या पूर्णपणे असत्य असल्याचं ते या ट्विटमधून म्हणाले. ‘मी मुंबईतच असून, मंगळवारी विधानभवनातील कार्यालयात उपस्थित राहणार आहे’, अशी माहिती त्यांनी ट्विट करत देत कार्यालयाचं नियमित कामकाज सुरू राहणार असल्याचंही ते म्हणाले.
15 दिवसांत मोठी घडामोड घडणार – सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आगामी 15 दिवसांत दोन मोठी राजकीय घडामोड घडणार आहे. यामधील एक दिल्लीत आणि एक महाराष्ट्रात होणार असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सुप्रिया सुळेंच्या या दाव्यानं राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
म्हणूनच अजितदादा सर्वांना आवडतात
सुप्रिया सुळे यांना आजित पवार कुठे आहे असे विचारण्यात आले. यावर ‘तुम्ही सर्व चॅनलवाल्यांनी अजितदादांच्या मागे एक युनिट लावावे. राज्यात अनेक समस्या आहेत, राज्यात चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितले. अजित पवार भाजपासोबत जाणार का?, असा सवालही सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. यावर ‘हे दादांनाच विचारा…मला गॉसिपसाठी वेळ नाही, लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे खूप काम आहे, त्यामुळे मला त्याची माहिती नाही. पण कष्ट आणि मेहनत करणारा नेता असल्याने अजितदादा सर्वांनाच आवडतात. त्यामुळे अशी विधाने केली जातात, असं स्पष्टीकरण सुप्रिया सुळेंनी दिलं.